रत्नागिरी:-भाजपाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त आज येथील दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ मंडळींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद द्यावेत, मार्गदर्शन करावे, पक्ष वाढण्यासाठी मदत करावी. लोकसभा निवडणूक कमळाच्या निशाणीवर लढवली गेली पाहिजे, अशी आपल्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना अब की बार ४०० पार खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन भाजपा नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार बाळ माने म्हणाले की, ६ एप्रिल १९८० रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपाची स्थापना झाली. सूरज उगेगा कमल खिलेगा असे वाजपेयी म्हणाले होते. आज भाजपाची घोडदौड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची शक्ती वाढत आहे. भाजपाचे कोकणातील खासदार प्रेमजीभाई आसर, अॅड. बापूसाहेब परुळेकर यांच्यानंतर कमळ निशाणीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आज पुन्हा संकल्प करूया.
प्रास्ताविकात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपाच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रशांत डिंगणकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, मंडल अध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, अॅड. भाऊ शेट्ये, अॅड. विलास पाटणे, सुजाता साळवी, महेंद्र मयेकर, राजन फाळके, सतेज नलावडे, सचिन वहाळकर, नंदू चव्हाण आदी उपस्थित होते. वर्धापनदिनाचे औचित्य साधून भाजपा कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. त्याचा लाभ शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
समारंभात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन केला. यामध्ये दादा देशमुख, श्रीमती म्हापुसकर, प्रकाश सोहनी, मोहन दामले, अॅड. विलास पाटणे, अॅड. बाबा परुळेकर, शिल्पाताई पटवर्धन, अॅड. धनंजय भावे, अॅड. रंजना भावे, अरविंद कोळवणकर, सुनीता पाटणकर, विजय पेडणेकर आदींसह ५० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सहृदय सत्कार करून रत्नागिरीत भाजपाचा वर्धापनदिन साजरा
