फरारी चालकावर गुन्हा
खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे तरूणाच्या डोक्यावरून अज्ञात अवजड वाहन गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. राकेश रमेश माने (27, रा. गुणदे-तलारीवाडी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर अज्ञात अवजड वाहनचालकाने अपघातस्थळावरून पलायन केल्याने या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश माने हा आपल्या ताब्यातील दुचाकीने (एम.एच.08/ए.एक्स. 2884) एक्सल फाटा बाजून पिरलोटेनजीक जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिली. यावेळी दुचाकीसह रस्त्यावर पडल्यानंतर अवजड वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने पोबारा केला. अपघाती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फरारी चालकाचा शोध सुरू आहे.