गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील मौजे निवोशी दणदणेवाडी येथील बंद असलेले स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू होण्याबाबत दणदणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ रोजी पालशेत-निवोशी ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की निवोशी दणदणेवाडी क्षेत्रातील स्ट्रीट लाईट जवळ जवळ पाच ते सहा महिने बंद असून त्यावर कोणतीही दुरुस्ती उपाययोजना झालेली नसल्यामुळे ऐन गणेशोत्सवात आम्हा नागरिकांना अंधारमय वातावरणात राहावे लागले, दणदणे वाडी परिसरात एकूण तीन स्ट्रीट लाईट आहेत,त्यातील एक विजेवर तर दोन सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत,यातील सौरऊर्जेवर चालणारे दिवे गेली अनेक वर्षे बंद आहेत. मात्र ग्रामपंचायत स्तरावर त्यावर दुरुस्ती अथवा कोणतीही उपाययोजना झालेली दिसत नाही.
सदर दणदणेवाडी क्षेत्र हे जंगल परिसराला लागून असल्याने, येथे सरपटणारे प्राणी,तसेच बिबट्याचे वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे,बिबट्याने आमच्या मानववस्तीत येऊन कुत्रे, मांजर, गुरांवर अनेक वेळा हल्ले केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्याचबरोबर सरपटणारे प्राणी साप,विंचू ,इंगली यांपासून नागरिकांना दंश होऊन जीविताला धोके निर्माण होत असल्याने सदर संभाव्य धोके लक्षात घेऊन दणदणेवाडी क्षेत्रातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट समस्येवर योग्य ती उपाययोजना करून त्या लवकरात लवकर चालू कराव्यात अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना वाडी संपर्क प्रमुख संतोष दणदणे यांच्या सह विजय दणदणे,अनिल दणदणे,संदीप दणदणे, अनंत दणदणे, सुरेश दणदणे,रमेश दणदणे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.