गुहागर:-विसर्जन करुन समुद्रातून परतत असताना मोठ्या लाटेने पाच तरुणांना समुद्रात ओढले. ऐन विसर्जनादरम्यान घडलेल्या या घटनेने एका खळबळ उडाली. ओहटीच्या पाण्यातून बाहेर पडण्याची त्या तरुणांची धडपड सुरू होती. अशावेळी तैनात दोन सुरक्षा रक्षकांनी टाकलेला दोरखंडाला बांधलेला बोया त्यांच्या हाती लागला. त्या दोरखंडाद्वारे दोघांनी पाच जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्नात त्यांचा अन्य एक सहकारी पाण्यात ओढला गेला. परिणामी 6 जणांची किनाऱ्यावर परतण्याची धडपड सुरू असताना दोन सुरक्षा रक्षकांसह किनारपट्टीवरील दहा-बारा जणांनी दोरखंडाचे टोक पकडल्याने या सहाही जणांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. सदर घटना गुरुवारी गौरी गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी गुहागर समुद्रावर दुर्गादेवी पाखाडी परिसरात घडली.
गुहागर नगरपंचायतीचे आशिष दिलीप सांगळे, जगन्नाथ धोंडू घोरपडे हे दोन सुरक्षा रक्षक समुद्र किनारी तैनात होते म्हणून एक मोठी दुर्घटना टळली. शहरातील 6 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर गौरी गणपतीचे सामुहीक विसर्जन सोहळे पार पडतात. प्रत्येक ठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या भागातून मिरवणुकीने गौरी-गणपती विसर्जनासाठी आणले जातात. या सर्व ठिकाणी कोणतीही अघटीत घटना घडू नये म्हणून नगरपंचायतीद्वारे 2 ते 4 सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. या सुरक्षा रक्षकांकडे दोरखंड, बोया, लाइफ जॅकेट, शिट्टी असे साहित्य दिलेले असते.
गुरूवारी सायंकाळी उशिरा अशाप्रकारे दुर्गादेवी वाडीतील गौरी गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. भक्तीभावाने सर्व गौरी गणपतींची समुद्रावर सामुहिक आरती झाली. त्यानंतर एकेक गणपतीची मूर्ती घेवून तरुण समुद्रात विसजर्नासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तींचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱयावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला. समुद्रात अडकलेल्या तरुणांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली. त्यांना वाचवताना त्यांचा आणखी एक सहकारी पाण्यात ओडला गेला. मात्र सुरक्षा कर्मचारीसह किनाऱ्यावरील लोकांनी प्रसंगावधान राखत बोया दोरखंड ओढळल्याने दुर्घटना टळली. सर्वजण किनारी परतले. हे सर्वजण सुखरूप घरी परतले असले तरी जीवनमरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले हे तरुण आजही कालच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.