लांजा : तालुक्यातील खेरवसे जाधववाडी येथे रात्रीच्या सुमारास टेम्पोतून गुरांची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरे, गादिसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समीर किसन खानविलकर ( पानगलेवाडी, ता.लांजा), बाबल्या पांडुरंग लांबोरे (धुंदरे कालभैरव नगर, ता.लांजा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई बुधवार २५ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, समीर खानविलकर, बाबल्या लांबोरे हे दोघे टेम्पो क्रमांक (एमएच.०८.एपी.४२३४) मधून गुरांच्या वाहतुकीचा परवाना नसताना खेरवसे जाधववाडी येथे वाहतूक करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली त्यानुसार बुधवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी गाडीची चौकशी केली असता गाडीत गुरे असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे चौकशी केली असता गाडीचा गुरे वाहतुकीचा कोणता परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी दोघानाही ताब्यात घेतले.
या कारवाईत एक २ हजार रूपयांची गाय, २ हजार ५०० रूपयांची एक गाय आणि २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो असा एकूण २ लाख ५४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेकायदा व विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१), (घ), (ड), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९८१ चे, ११९, मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५) नुसार बाबल्या लांबोरे याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.