लांजा:-मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा उपद्रव सुरू झाला आहे. या गुरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
महामार्गावर दहा-पंधरा गुरे कळपाने शहरात फिरताना दिसतात. महामार्गावर दिवसा व रात्री-अपरात्री ही गुरे महामार्गाच्या मध्यभागी अचानक आडवी येत असल्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. गुरे पादचाऱ्यांच्या अंगावर येण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पादचाऱ्यांना जनावरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भाजीविक्रेते, व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मोकाट गुरांचा त्रास हा वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवावर बेतणारा आहे.
लांजा शहरात कोर्ले फाटा, बाजारपूल, नगरपंचायत परिसर, पेट्रोलपंप, बसस्थानक, साटवली फाटा, लांजा हायस्कूल, कुक्कुटपालन या ठिकाणी मोकाट गुरे महामार्गावर कळपाने दिसतात. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होऊन परिणामी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा नगरपंचायत आणि वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.