राजापूर:- राजापूर तालुक्यात गेले दोन दिवस वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस कोसळत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. आंबोळगड व तुळसुंदे येथे घरावर वीज पडल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
राजापूर तालुक्यात सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी शेतीची कामे देखील वेळेत पूर्ण झाली होती. त्यानंतर आता शेती कापणीयोग्य झाली असून काही ठिकाणी भातकापणीला सुरूवात देखील झाली होती, अशातच परतीच्या पावसाने जोर धरल्याने भातकापणीची कामे रखडली आहेत. तर काही शेतक-यांनी कापलेले भात पावसामुळे भिजल्याने शेतक-यांचे देखील नुकसान झाले आहे.
त्यातच तालुक्यात गेले दोन दिवस सायंकाळनंतर वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या देखील घटना घडत आहेत. सोमवारी झालेल्या वादळी पावसामध्ये सागवे गावातील बुरंबे येथील देवानंद जोशी यांच्या दुकानावरील छप्पर उडाल्याने नुकसान झाले आहे. तर येथीलच विकास जोशी व अनंत जोशी यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच कशेळी वरचीवाडी येथे पिंपळाचे झाड मोडून पडल्याने वीजखांब तुटले आहेत.
दरम्यान मंगळवारी रात्रीदेखील वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये आंबोळगड येथील शुभांगी बाळकृष्ण तावडे यांच्या घरावर वीज कोसळून नुकसान झाले आहे. तर तुळसुंदे उगवतीवाडी येथील नरेश आंबेरकर यांच्या घरावर वीज कोसळल्याने भिंतीचे नुकसान झाले असून घरातील वीजमीटरसह इलेक्ट्रीक साहित्य देखील जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसेच कारीवणे चांदवणवाडी येथे वीजखांब व ट्रान्सफार्मर पूर्णपणे वाकले असून वीजपुरवठा खंडीत झाला आहे.