लांजा:-भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लिंगायतवाडी येथील जितेंद्र (राजू) रामचंद्र लिंगायत यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत हा बिबट्या पडला. मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास विहिरीत काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज झाला. मात्र त्यावेळी पाऊस होता असल्याकारणाने घरातील लोकांनी काहीतरी पडले असेल असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जितेंद्र लिंगायत यांच्या पत्नी सीमा लिंगायत यांनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी विहिरीतील पंप सुरू केला. त्यावेळी त्यांना पंपातून पाणी गढूळ येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सीमा या पूजेची फुले काढण्यासाठी विहिरीजवळ गेल्या असता त्यांना विहिरीवरील झाकण विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना दिसून आले. सीमा यांनी घाबरल्या अवस्थेत याची माहिती घरातल्यांना दिली. घरातील लोकांनी तात्काळ याबाबतची माहिती वनविभागाला दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लांजाचे वनपाल सारीक फकीर, एम.जी. पाटील, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, सिद्धार्थ हिंगमेरे, व्ही.डी.कुंभार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागविण्यात आला. यानंतर लांजा पोलीस स्थानकातील पो.हेड.कॉन्स्टेबल नासिर नावळेकर, वाहतूक पोलीस रहिम मुजावर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याच्या सहाय्याने सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले.