मालवण:-सावंतवाडी मतदारसंघ हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीने सोडला आहे, अशी चर्चा दोन दिवस सुरू आहे. अद्याप पर्यंत असा कुठलाही निर्णय झालेला नाही.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेलाच द्यावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. दीपक केसरकर यांचा पाडाव करणे हाच आमच्या एकमेव उद्देश आहे. असे असले तरी गद्दारांना गाडण्यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
ते म्हणाले, अर्चना घारे-परब यांना उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचे काम करू, वरिष्ठ आदेश देतील तो मान्य असेल. आमचा अर्चना घारे-परब यांच्यावर रोष नाही. पण हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांची भावना चुक म्हणू शकत नाही. शिवसेनेसाठी आम्ही आग्रही आहोत. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडीचे नेते या संदर्भातील भुमिका जाहीर करतील. अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. शिवसेना ही संघटना आदेशावर चालते. पक्षप्रमुख यांचे आदेश मानून शिवसैनिक काम करतो. असे बाबुराव धुरी म्हणाले.
माजी आमदार राजन तेली यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चाविषयी विचारले असता बाबुराव धुरी म्हणाले, राजन तेली पक्षात आले तर स्वागतच आहे. त्यांच्या बाबतीतली भुमिका हे पक्षप्रमुख घेतील. संघटना मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. राजन तेली यांना संघटनेने उमेदवारी दिली तर त्यांचे काम करणार अशी माहिती धुरी यांनी दिली. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, बाळू परब, अशोक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.