लांजा:-साटवली परिसरात माकडांनी घातलेल्या उच्छादाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामस्थांच्या आग्रही मागणीनुसार वनविभागाच्या वतीने साटवली गावात आज शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी माकडे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली.
यामुळे या ठिकाणी २० माकडे पिंजराबंद करण्यात आली. माकडे पकडण्याची तालुक्यातील पहिलीच मोहीम साटवली येथे राबविण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून साटवली परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. लोकांच्या घरांवरील कौले व पत्रे यांच्या नुकसानी बरोबरच भाजीपाला शेती आणि बागायती यांची देखील मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात होती. माकडांच्या टोळीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग पुरते हैराण झाले होते. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांच्यासह साटवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून वनविभागाने या ठिकाणी माकड पकडण्याची मोहीम राबवण्यात यावी अशी आग्रही मागणी केली जात होती .आणि त्याबाबत वनविभागाला देखील कळविण्यात आले होते .
या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी सकाळपासूनच साटवली परिसरात वनविभागा मार्फत माकडे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी (राहणार सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांनी अतिशय कुशलतेने माकडांना जेरबंद केले. या कामात त्यांना अमित लांजेकर, महेश धोत्रे, शाहिद तांबोळी यांनी मदत केली
ही संपूर्ण मोहीम विभागीय वनअधिकारी चिपळूण(प्रा) गिरीजा देसाई, सहा.वनसंरक्षक चिपळूण (प्रा) प्रियांका लगड, परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल सारीक फकीर, वनरक्षक लांजा बाबासाहेब ढेकळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, अविनाश पावसकर, वैभव किल्लेकर ,जगन्नाथ सपकाळ, प्रसाद तरळ, नितीन तरळ, प्रकाश सावंत, चंद्रकांत कालकर, उपस्थित होते. उपद्रवी माकडांना जेरबंद केल्याने साठवली ग्रामस्थ, शेतकरी यांनी वनविभागाचे आभार मानले.
दरम्यान, पकडण्यात आलेल्या माकडांना दूर अभयारण्यात सोडावे, जेणेकरून ती पुन्हा परतणार नाहीत, अशी मागणी साटवली ग्रामस्थांनी केली आहे.