राजापूर : वडिलोपार्जित सामायिक जमिनीवरून असलेल्या वादातून एका वृध्दाला चुलत भावांनी मारहाण केल्याची घटना कळसवली, आमटेवाडी येथे घडली. या प्रकरणी केशव जानू सुवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, गोपाळ भिकाजी सुवरे, धनाजी भिकाजी सुवरे व सविता धनाजी सुवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव जानू सुवरे (71, रा. कळसवली, आमटेवाडी) यांचे जमीन जागेवरून चुलत भावांशी वाद आहेत. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास दसरा सण असल्याने केशव सुवरे हे घराजवळ फुले काढण्यासाठी जात असताना धनाजी सुवरे, त्याची पत्नी सविता सुवरे व गोपाळ सुवरे यांनी केशव सुवरेंना शिवीगाळ करुन लाकडी दांडयाच्या सहाय्याने मारहाण केली. यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या केशव सुवरे यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या केशव सुवरेंना राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार करुन अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी केशव सुवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ सुवरे, धनाजी सुवरे, सविता सुवरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 352, 351 (2), 3 (5), 131, 118(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.