रायगड प्रतिनिधी:-रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध पर्यटनाचे ठिकाण असलेल्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे रविवारी मध्यरात्री धकादायक घटना घडल्याने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. हरेश्वर येथे मध्य धुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांनी एका महिलेला गाडीखाली चिरडून तिचा जीव घेतल्याची घटना घडली असून याप्रकरणी ग्रामस्थांच्या मदतीने एका पर्यटकाला ताब्यात घेतले आहे ,अन्य आठ आरोपी फरारी झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की पुणे येथील ११ जणांचा एक ग्रुप रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास हरेश्वर येथील ममता होम स्टे या हॉटेलवर आले होते, सर्व पर्यटक दारू पिऊन आलेले असल्याने त्यांनी रूमच्या भाड्या संबंधी वाद निर्माण केला, एवढेच नव्हे पर्यटकांनी हॉटेल मालक अभि धामणस्कर यांना मारहाण केली. धामणस्कर यांनी आरडाओरडा केल्यामुळे तेथून सर्वजण त्यांनी आणलेल्या एम एच १२- जीएफ – ६१०० या क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनातून पळून गेले. परंतु पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्यापैकी एक साथीदार घटनास्थळी थांबला. त्याला नेण्यासाठी सर्वजण हॉटेल जवळ परत आले.
धामणस्कर यांच्या हॉटेल जवळ झालेल्या गोंधळामुळे त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. आमचा रस्ता सोडा नाहीतर तुम्हाला ठार मारू अशी धमकी देत एका आरोपीने जमावाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, यामध्ये गाडी वेगाने मागे घेत असताना धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर (३४) गाडीखाली चिरडल्याने जागीच मरण पावली. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. परंतु त्यांच्यातील एक जण घटनास्थळी थांबला होता. त्याचे नाव ईराप्पा यमनप्पा धोत्रे ( रा. पिंपरी चिंचवड पुणे) असे असून नागरिकांनी त्याला श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात दिले. फरारी झालेल्या आरोपींपैकी दोघेजण श्रीवर्धन बस स्थानका जवळ असल्याचे समजतात पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले.
अन्य आरोपी पुण्याच्या दिशेने पळून गेल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशन वरून आढळून आले, त्यांचा तपास घेण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांचे एक पथक पुण्याकडे रवाना झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गरजे यांनी दिली. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये आकाश उपरवट, आकाश गावडे, नीरज उपरवट, आशिष सोनवणे, अनिल माज,विकी सिंग, अलीम नागूर, सचिन जामदार, आदिल शेख, हिरप्पा धोत्रे, सचिन टिल्लू, या ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०३ (१) ,३५१ (३),११५(२),३(५), आणि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लटके करीत आहेत.