लांजा : वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या तुफानी पावसामुळे तालुक्यातील कणगवली जिल्हा परिषद शाळा येथील विजेचा ट्रान्सफॉर्मरसह सात वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे संपूर्ण गावातील ३०० घरांचा वीज पुरवठा खंडित झाला असून संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन वर्षापासून वारंवार महावितरणला कल्पना देऊन ही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
तालुक्यातील कणगवली जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी संपूर्ण कणगवली गावाला विद्युत पुरवठा करणारा विजेचा ट्रान्सफॉर्मर (डिपी) आहे. हा ट्रान्सफॉर्मर गेली दोन वर्षे धोकादायक स्थितीत होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल इंगळे यांनी सातत्याने महावितरणच्या कार्यालयाकडे हा ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलण्यात यावा अशी मागणी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वारंवार महावितरणकडे याबाबत पत्र व्यवहार, पाठपुरावा केला जात होता. मात्र महावितरणकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते.
सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण गावाला वीज पुरवठा करणारा हा ट्रान्सफॉर्मर (डीपी) कोसळला. या ट्रान्सफार्मरसह आजूबाजूचे विजेचे सात ते आठ खांब देखील कोसळल्याने संपूर्ण कणगवली गाव अंधारात बुडाले आहे. गावातील आठ वाड्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून ३०० घरे अंधारात बुडाली आहेत. या घटनेमुळे महावितरणचे देखील हजारो रुपयांचे नुकसान झाले असले तरी त्यांच्याच चालढकल धोरणामुळे ही घटना घडली असून ग्रामस्थांतून यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.