संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहेत. शिवाय अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. भातशेती आणि वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वाशी तर्फे देवरूख येथे गोठ्यावर वीज कोसळून २ बैल व १ दुभती गाय जागीच ठार झाल्याची घटना घडली. तसेच २ बैल व ३ गाई होरपळून जखमी झाल्या आहेत.
वाशी तर्फे देवरूख येथील दत्ताराम गोविंद पेंढारी यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यावर सोमवारी रात्री वीज कोसळली. विजेच्या मोठया आवाजाने परिसर हादरला होता. याचवेळी पेंढारी यांच्या गोठ्यावर ही वीज कोसळून २ बैल आणि १ दुभती गाय जागीच ठार झाले. या विजेच्या ज्वाळांनी बाजूला असलेल्या 3 गायी आणि 2 बैल होरपळून जखमी झाले. एकूण ३ जनावरे दगावली आहेत. तर 5 जखमी झाली आहेत. या घटनेने पेंढारी कुटुंब हादरून गेले. जखमी गुरांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. २ बैल आणि ३ गाईना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. पेंढारी यांचे १ लाख ६० हजार रुपये नुकसान झाले आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जखमी गुरांवर उपचार केले. तसेच मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. पेंढारी यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.