संगमेश्वर/दिनेश अंब्रे:-संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे गावातील रहिवासी महेश नागवेकर यांच्या पत्नी सौ. भक्ती नागवेकर यांनी देवरुख एसटी डेपोमध्ये वाहक म्हणून ११ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून १२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने कोंड असुर्डे गावचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी सदिच्छा भेट घेऊन सौ. भक्ती नागवेकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
भक्ती नागवेकर या प्रवाशांना उत्तम सेवा देणाऱ्या, मनमिळाऊ, शांत आणि सदा हास्य असलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. यावेळी त्यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एसटी महामंडळात भरती होताना भाऊ भालचंद्र मयेकर (पोलीस, रत्नागिरी) आणि मंदार मयेकर यांचे वेळोवेळी प्रोत्साहन लाभले. त्याचबरोबर आई कैलासवरती दीपाली मयेकर आणि वडील दिलीप मयेकर यांची इच्छा होती की, शिक्षण घेतल्यानंतर त्यांची मुलगी वृषाली ही नोकरीला लागावी. त्या स्वप्नाच्या पूर्ततेचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
सत्कार सोहळ्यादरम्यान, भक्ती नागवेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय सासू मंगला नागवेकर यांना दिले, ज्या नेहमीच त्यांना घरातील कामात मदत करतात. त्यांच्या मुली सदिच्छाही घराच्या कामात साथ देते. तसेच पती महेश नागवेकर यांची विश्वासार्ह साथ संसारात मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांची आणि अधिकाऱ्यांची चांगली वागणूक मिळत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांचीही उपस्थिती होती.