नवी दिल्ली : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची गुरुवारी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 11 नोव्हेंबरला शपथ घेतील. याच्या एक दिवस आधी, विद्यमान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार आहेत.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी 8 नोव्हेंबर 2022 रोजी CJI म्हणून पदभार स्वीकारला होता.
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. ते 11 नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली. विद्यमान सरन्याधीश डी. वाय. चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनीच न्यायमूर्ती खन्ना यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. परंपरा अशी आहे की विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस तेव्हाच करतात जेव्हा त्यांना कायदा मंत्रालयाने तशी विनंती केली जाते.
सरन्याधीश चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव ज्येष्ठता यादीत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती खन्ना यांचे नाव पुढे करण्यात आले. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. 64 वर्षीय न्यायमूर्ती खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी 65 निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे 275 खंडपीठांचा भाग राहिले आहेत.