संगमेश्वर : विश्वासाला तडा जाणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अंगावरील दागिने काढून घेत तिला पुलावरून ढकलून तिथून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने कामगारांनी तिला वाचवले.
सविस्तर वृत्त असे की, मूळ गुहागर येथील सद्या मुंबई येथे असलेली तरुणी आपल्या मुंबईतीलच प्रियकरासह संगमेश्वर तालुक्यातील भातगाव येथील निसर्गरम्य परिसरात 22 ऑक्टोबर रोजी फिरण्यासाठी गेले होते. मात्र प्रियकराच्या मनात काहीतरी भलतेच शिजत होते. यावेळी तिच्या अंगावरील दोन लाख 25 हजार सोन्याचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, 20 हजार रुपये किमतीचा कानातील टॉप, 20 हजार किमतीचे चार ग्रॅम कानातील सोन्याचे झुमके, 20 हजार रुपये किमतीचे साखळ्या, 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे धातूच्या दोन अंगठ्या, 25 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या जातीचे गळ्यातील चेन, 10 हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या धातूचे दागिने असे एकूण रुपये चार लाख किमतीच्या सोन्याचे दागिने काढून घेतले.
त्यानंतर त्याने तिला दोन्ही हाताने उचलून भातगाव पुलावरून ढकलून दिले आणि तेथून फरार झाला. तिने वाचवण्यासाठी जोरदार अरडाओरडा सुरू केला. तोपर्यंत ती पाण्याच्या प्रवाहाने वाहू लागली. सायंकाळच्या सुमारास आजूबाजूला असलेल्या कामगारांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन तिला वाचवले. सदरची घटना समजल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांना कळल्यानंतर सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे विनायक मानव यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर या घटनेची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांना प्राप्त झाल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली तसेच घटनेची पाहणी केली. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आले असून संशयित नितीन गणपत जोशी (27 वर्ष राहणार पाणबुडी सध्या राहणार नालासोपारा ठाणे) यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात बी एन एस 109/309 (6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागरगोजे करीत आहेत.