रत्नागिरी:-शहरातील माळनाका येथे दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना रविवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (७७, सन्मित्र नगर, रत्नागिरी) असे ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, ज्येष्ठ नागरीक असलेले दत्तप्रसाद गोडसे हे माळनाका ब्रीज इथून चालत जात असताना एका दुचाकीस्वाराची खडीवरून दुचाकी घसरून त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत गोडसे हे रस्त्यावर कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्त दुचाकीस्वाराने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.