राजापूर तालुकाध्यक्ष किशोर नारकर यांची माहिती
राजापूर:-काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला द्यावा, अशी आग्रही मागणी केलेली असतानाही काँग्रेस पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही जागा न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
त्यामुळेच काँग्रेस पक्षाकडून राजापूर मतदारसंघामधून अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते लाड यांच्या ठामपणे पाठीशी उभे असल्याची माहिती काँग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष किशोर नारकर यांनी दिली आहे.
राजापूर विधनसभा मतदारसंघातून अविनाश लाड यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाने केली होती. मात्र, त्याबाबत विचार न करता ही जागा विद्यामान आमदार राजन साळवी यांना देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अस्त्विाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानुसार अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळविले आहे. हा फॉर्म भरताना केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढविणे व प्रलंबित राहिलेल्या विकासकामांना चालना मिळावी, या उद्देशाने हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लांजा, राजापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते हे अविनाश लाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे लाड यांना आमचा ठाम पाठिंबा असून त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे नारकर यांनी नमूद केले आहे.