रत्नागिरी : महिलांकडे कर्तृत्व आहे. त्यामुळे महिला पुरुषांपेक्षा उजवे काम करून दाखवतात, हे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पाहिले आहे. या दुर्गाशक्तीरूपी महिलांमुळेच राज्य विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय नक्की आहे, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी व्यक्त केला.
पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात महिलांच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महिलांना स्वातंत्र्य दिले तर विजय नक्की आहे. महाविकास आघाडीच्या महिला दुर्गाशक्ती असून शक्तीमुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होणार आहेत. रत्नागिरीमध्ये मशालीच्या निशाणीवर बाळ माने यांच्या रूपाने आमदार म्हणून निवडून येतील. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्वजण प्रचंड मेहनत घेणार आहोत.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने, माधवी माने, विधानसभा क्षेत्रसंघटक सायली पवार, उपतालुका संघटक रेश्मा कोळंबेकर, रत्नागिरी महिला शहरप्रमुख मनीषा बामणे, उपशहरप्रमुख कोळेकर, विभागप्रमुख सायली केतकर, सेजल बोराडे, उपतालुका संघटक समिधा भाटकर, विजया घुडे, प्रेरणा घडशी, विभाग संघटक सायली केतकर, उपविभाग संघटक मंदा ठीक, शाखा संघटक रंजना ढेपसे आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या.
यावेळी मनिषा बामणे म्हणाल्या, महिला शक्ती आपल्या उमेदवारांच्या पाठीशी असून नेहमीच आपला पक्ष जिंकण्यासाठी काम करतो. प्रचाराचे काम चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सायली पवार यांनी दिली. या वेळी महिला संघटनेत काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्या महिलांना नियुक्तीपत्र महाडिक, माने आदींच्या हस्ते वितरित करण्यात आले.
याप्रसंगी बाळ माने यांनी सांगितले की, कोकणात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. आपण शिवरायांचे मावळे आहोत. जवळपास ३० वर्षे भाजप-शिवसेना युती म्हणून मी काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी, विभागप्रमुखांशी माझे चांगले संबंध आहेत. मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपली मशाल निशाणी असून ती या वेळी नक्की पेटणार व गद्दारांना जाळून टाकणार, असा मला विश्वास आहे.