संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे १९ वर्षाखालील मुला मुलींचे दोन्ही संघ विभागीय खो-खो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. एस. व्ही. जे. सी. क्रीडासंकुल, डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मुले व मुली संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त करून हा सन्मान प्राप्त केला आहे.
महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात लांजा कनिष्ठ महाविद्यालयावर मध्यंतराला ०५-०५ बरोबरी असताना, दुसऱ्या डावात ०५-०३ गुण प्राप्त करून अत्यंत चुरशीच्या सामन्यात २ गुणांनी विजय प्राप्त केला. तर मुलींच्या संघाने अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाकडे मध्यंतराला ०९-०५ अशी आघाडी असताना, दुसऱ्या डावात ‘आठल्ये-सप्रे-पित्रे’ने ३ गुणांनी विजयश्री खेचून आणली. मुलींमध्ये दिव्या सनगले व प्रीती सनगले यांनी तर मुलांमध्ये शुभम कळंबटे यांनी सर्वांगसुंदर खेळाचे प्रदर्शन करून विजयाला मौलिक हातभार लावला.
महाविद्यालयाच्या दोन्ही विजेत्या संघांना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
मुलांचा संघ- शुभम सूवारे(कर्णधार), ओंकार मुंडेकर(उपकर्णधार), आदित्य गोरुले, आदित्य कळंबटे, आर्यन सुर्वे, आर्यन पावसकर, सौरभ आग्रे, कुंज गोरुले, निनाद सावंत, यश कदम, सम्यक कदम, सर्वेश सुवारे, सुमित दुदम आणि शुभम कळंबटे.
मुलींचा संघ-दिव्या सनगले(कर्णधार), प्रीती सनगले(उपकर्णधार), पूर्वा टक्के, दिपाली सनगले, तन्वी जाधव, सलोनी जाधव, सानिका आग्रे, सिद्धी भागडे, सिद्धी चोरगे, सिद्धी धावडे, सृष्टी आग्रे, स्नेहा गावडे, स्नेहल धामणे आणि सिद्धी पर्शराम.
दोन्ही संघांना न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक तानाजी कदम आणि महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गतवर्षी महाविद्यालयाच्या मुलांचा संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेत उपविजेता ठरला होता. दोन्ही यशस्वी संघातील खेळाडू व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.