एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी
संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नयन गणेश मुळे यांना वसतिगृहातील मुलींच्या विनयभंग प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अन्य दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथे मुलींचे वसतिगृह आहे. हे वसतिगृह अनधिकृतपणे चालवत असल्या प्रकरणी आणि मुलींच्या विनयभंग प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात शाळेतील ग्रंथपाल महिलेने पोलिसात फिर्याद दिली होती. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वसतीगृह चालविणारे संस्थेचे अध्यक्ष नयन मुळये (68, कोळंबे, संगमेश्वर), त्यांचा मुलगा प्रथमेश मुळये (36, कोळंबे) व मुख्याध्यापक संजय मुळये अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ग्रामीण वार्ताला मिळालेल्या माहितीनुसार,या प्रकरणात नयन मुळ्ये यांनी 22 ऑक्टोबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. अखेर संगमेश्वर पोलिसांनी नयन मुळ्ये यांना सोमवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.
काय आहे प्रकरण?
कोळंबे येथील मुलींच्या वसतिगृहात मुलींसोबत विनयभंगाचा प्रकार घडला होता. हि घटना ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती.जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.
कोळंबे येथे मागील 3 वर्षापासून हे मुलींची वसतिगृह सुरू आहे. अनेक ग्रामीण भागातील गरजू, गरीब मुलींना वाडी, पाड्यावरून शिक्षणासाठी याठिकाणी आणण्यात येत होत़े. या मुलींच्या वसतिगृहासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार ग्रंथपाल महिलेच्या लक्षात आला. त्यांनी याबाबतची तक्रार ऑनलाईन पोलीस स्थानकात दाखल केली. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर पोलिसांकडे प्रकरण पाठवले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस दोन दिवस जाऊन तपास करत आहेत.
पोलिसांनी मुलीचे जाब जबाब नोंदवून घेऊन संस्था चालक नयन मुळये,त्यांचा मुलगा प्रथमेश मुळये व मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी नयन मुळ्ये यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर ते स्वतः पोलिसात हजर झाले. त्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.