रत्नागिरी:-येथील वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांचे मार्गदर्शन शिबिर पार पडले.
आशा सेविकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालय सातत्याने रत्नागिरीतील आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून गावातल्या घराघरात पोहोचणाऱ्या आशा सेविकांना आरोग्यविषयक अत्याधुनिक माहिती देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका माने आरोग्य सहाय्यक श्री. झोरे, आरोग्य सहायिका श्रीमती देसाई, आशा पवार, गटप्रवर्तक तन्वी बोरकर आणि सायली शेट्ये उपस्थित होते.
आशा सेविकांना विविध विषयांवर त्यातही वंध्यत्व या विषयावर आवर्जून मार्गदर्शन करण्यात आले. आशा सेविका ग्रामीण भागातील घराघरातल्या आरोग्य क्षेत्राच्या दुवा आहेत. तेथील ज्येष्ठ नागरिक, मुले आणि विशेषतः महिलांच्या आरोग्याची काळजी आशा सेविका घेत असतात. त्यामुळे त्यांचे या समाजातले स्थान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रातही आशा सेविका मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी आणि गटप्रवर्तक एच. डी. इंदुलकर उपस्थित होते. वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरकडून प्रशासकीय विभागाचे शैलेश धुळप, एम्ब्रियोलॉजिस्ट श्वेता कदम, परिचारिका प्रियांका मासये उपस्थित होत्या.