रत्नागिरी:-वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थने जागतिक मानसिक आरोग्य दिनासाठी कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही संकल्पना जाहीर केली. त्यानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे प्रा. स्वामिनी चव्हाण (मानसशास्त्र विभाग प्रमुख) आणि त्यांचे विद्यार्थी दिव्या कीर, मालवी होरंबे, हिमानी बारये, सानिका बंदरकर, पूर्वा भारती, पूर्वा कदम, साक्षी भाटकर, जुई गणपुले, तुबा मुकादम, वैष्णवी श्रीनाथ, मधुश्री वझे यांनी मानसिक आरोग्याशी निगडित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी प्राचार्य. डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होते. कार्याक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिठ्ठीद्वारे छान संदेश पोहोचवण्यात आले. अनेक सकारात्मक संदेश देणाऱ्या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी रोज उचलायची व वाचायची. दिवसभरात घडलेली एखादी गोष्ट ज्यासाठी आपण कृतज्ञ आहोत ते लिहून यात ठेवायचे. रोजच्या जीवनात मानसिक ताणतणावाचा सामना करण्यासाठी किंवा त्याला दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय वापरतो ते लिहायचे. विविध प्रकारच्या चित्रकला व रंग भरण्याच्या कला शाखेच्या कर्मचाऱ्यांना शिकवून त्यांना करून देण्यात आले. मेंदूला चालना देणारी आणि मानसिक ताणाला दूर सारणारी काही कोडी सोडवण्यासाठी ठेवली आहेत. मानसिक ताण कमी व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आतापर्यंत एकूण १०० हून अधिक जणांनी मेंटल हेल्थ टेबलला भेट दिली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान समितीचे सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही परिचारिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांनीसुद्धा भेट देऊन कौतुक केले. त्यांनी त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.