रत्नागिरी:-भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभेची एकही जागा मिळाली नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. काहीजण नाराजी व्यक्त करतात तर काहीजण नाराजी व्यक्त करत नाहीत.
महायुतीत राजकारण चालू आहे. रामदास कदम यांनी व्यक्तव्य केले की रामदास कदमांचा तो कुटील डाव होता याचे स्पष्टीकरण महायुतीच्या नेत्यांना द्यावे लागणार आहे, असे विधान भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.
महायुतीच्या जागेचा तिढा सुटला असून महायुतीकडून गुहागरमधून शिंदे शिवसेनेचे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवर माजी आमदार डॉ. नातू निवडणूक लढविण्यास इच्छुक होते आणि ही जागा भाजपलाच मिळणार, अशी दाट शक्यता होती; मात्र वाटाघाटींमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाराज असलेल्या डॉ. नातू यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची स्पष्टोक्ती केली.
शिवसेनेकडे मातब्बर उमेदवार असताना दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊन तो आपला आहे हे समजायचे आणि त्यांचा प्रचार करायचा. भाजपला मात्र उमेदवारी द्यायची नाही. अशाने जिल्ह्यातून कमळ निशाणी हद्दपार झाली असली, तरी ती भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.