झारखंडच्या नक्षलग्रस्त भागातून घेतले ताब्यात
कुडाळ पोलिसांची तत्पर कारवाई
कुडाळ:-चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी सौ.रेणुका ऊर्फ रेश्मा ओमप्रकाश सिंह (वय-42 वर्षे, रा. नेरुर कविलगांव), हिचा खून करून फरार झालेल्या ओमप्रकाश बंधन सिंह, (वय 52 वर्षे, सध्या रा. भडगाव, बुद्रुक, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, मुळ झारखंड राज्य) याला कुडाळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत झारखंडच्या नक्षलग्रस्त भागातून ताब्यात घेतले. १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा घडल्यापासून संशयित ओमप्रकाश सिंह हा फरार झाला होता. तो आत्महत्या करण्याच्या देखील मानसिकतेत होता. त्याची जाणीव असल्याने कुडाळ पोलिसांनी तातडीने विमानाने झारखंड गाठत त्याला ताब्यात घेतले आणि पुन्हा विमानानेच सिंधुदुर्गात आणले. त्याला बुधवारी रात्री ११ वाजता कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला ३ नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
पोलीस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यात भडगाव बुद्रुक येथे सेंट्रीगच्या कामासाठी राहात असलेल्या ओमप्रकाश बंधन सिंह, याने आपली पत्नी सौ. रेणुका ऊर्फ रेश्मा ओमप्रकाश सिंह हिला दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी भडगाव येथे बोलावून घेऊन रात्रौच्या वेळी झोपेतच तिचा चारीत्र्याचे संशयावरुन पत्नीचा गळा आवळून जीवे ठार मारुन तिचा खून केला व कुठेतरी पळून गेला. याबाबत मयत हिची मुलगी कु. रिया ओमप्रकाश सिंह (वय 19 वर्षे, रा. नेरुर कविलगांव हिने) दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
मोबाईल नम्बर बदलला पण…
गुन्हा घडल्यापासून आरोपी ओमप्रकाश बंधन सिंह हा फरार झालेला होता. पत्नीचा खून केल्याचे आरोपीने आपल्या मुलीस फोन करुन कळवलेले होते. परंतू आरोपीचा मोबाईल बंद असल्याने त्याचा काहीच सुगावा लागून येत नव्हता. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, हे गुन्हयाचा तपास करीत होते. आरोपीचे मुळ गावी तसेच नातेवाईक यांचेकडून आरोपी बाबत कोणतीही माहीती उपलब्ध होत नव्हती, कुडाळ पोलीस १५ ऑक्टोबर पासून आरोपीच्या मागावर होते. सुरुवातीच्या काळात संशयित ओमप्रकाश याचे लोकेशन मुंबईला दाखवत होते. त्यावरून मुंबई मध्ये सुद्धा पथक गेले होते. नंतर संशयिताने मोबिल नंबर बदलल्याने त्याचे लोकेशन त्यांनतर मिळत नव्हते. त्यामुळे सायबर विभागाची मदत घेऊन त्याच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरवरून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला .
पोलिसांचे पथक विमानाने रवाना
याच प्रयत्नात आरोपीबाबत तपास सुरु असतानाच संशयित आरोपी हा झारखंड हिंदगिरी भागात वास्तव्यास असल्याचे समजून आले. त्यावेळी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने तात्काळ त्या ठिकाणी विमानाने तपास पथक पाठवण्यात आले. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांचा समावेश होता. हे पथक दोन दिवस त्या ठिकाणी होते. तो संपूर्ण परिसर नक्षल प्रभावित परिसर असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगून तिथे स्थानिक पथकाच्या मदतीने परीसरावर लक्ष ठेवून शिताफीने आरोपीस झारखंड राज्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रातून ताब्यात घेण्यात आले आहे.
ओमप्रकाश आत्महत्येच्या मानसिकतेत ?
दरम्यान संशयित आरोपी ओमप्रकाश सिंह याला आपली पत्नी रेणुका ऊर्फ रेश्मा हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने तिला मारल्यावर तशी चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि मला तू धोका दिला असे म्हटले होते. त्याच्याजवळच्या डायरीत सुद्धा त्याचा उल्लेख होता. माझा फोटो कुडाळ पोलीस स्टेशनला पाठवा. असे त्या डायरीत माहिती सुद्धा पोलिसांनी दिली. पत्नीने धोका दिल्यामुळे तो आत्महत्या करायच्या देखील मानसिकतेत होता. त्यामुळे त्याला तातडीने ताब्यात घेणे सुसाध्य गरजेचे होते. कुडाळ पोलिसांनी हे काम तत्परतेने करत त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले असेच म्हणावे लागेल.
३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान संशयित आरोपी ओमप्रकाश बंधन सिंह याला दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करुन त्यास कुडाळ न्यायालयात हजर केले असता दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आलेली आहे.
कुडाळ पोलिसांची तत्पर कामगिरी
खूनातील फरार संशयित आरोपी पकडण्याची कारवाई सिंधुदुर्ग जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. कृषिकेश रावले, पोलीस उपअधीक्षक सावंतवाडी श्री. विनोंद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली व कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांचे देखरेखीखाली सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर असे झारखंड येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतलेले असून गेलेल्या तपास पथकास आरोपी मिळण्याकरीता वेळोवेळी लोकेशन बाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेगडे, पोलीस उप निरीक्षक अनिल हडाळ, पोलीस हवालदार प्रितम कदम तसेच सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग यांनी पाठपुरावा केलेला आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदुम यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे हे करीत आहेत.