रत्नागिरी:- पावस पंचक्रोशीत गेल्या दोन दिवसांप्रमाणेच शुक्रवारी सायंकाळीही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. दुपारी तीन वाजता पावसामुळे काळोख झाला होता. लक्ष्मीपुजनाची व्यापाऱ्यांची गडबड सुरू असतानाच पावसाने सुरवात केल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.
विजांच्या कडकडाटामुळे सायंकाळी साडेसातच्या कुर्धे-स्वरूपनगर परिसरामध्ये वीज पडल्याने एका घरातील विद्युत सामुग्री जळाली. इतर चौघांच्या घरातील विद्युत पंप व अन्य विद्युत उपकरणे जळाली आहेत. या परिसरात वीज पडल्याने सुमारे ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या पंचक्रोशीत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.