निवडणुकीतील राजकीय योगायोगाची सर्वत्र होतेय खुमासदार चर्चा
संगमेश्वर /एजाज पटेल:-2019 साली झालेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार?या विचारात संपूर्ण महाराष्ट्र पेचात असताना आणि साहजिकच संपूर्ण घडामोडी पाहता असा पेच निर्माण झाला आणि अनपेक्षितरीत्या राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे शपथ घेतली. योगायोग म्हणजे यंदा याच दिवशी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या तारखेची राजकीय वर्तुळात खुमासदार व तेवढीच मजेदार अशी चर्चा सुरू आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार, असा पेच निर्माण झाला होता. बरेच दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालल्यानंतर अनपेक्षित राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ च्या भल्या पहाटे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वाधिक नाट्यमय घडामोडींपैकी एक असा ठरला आहे.
पहाटे स्थापन झालेले फडणवीस, पवार यांचे महाराष्ट्रातील सरकार साडेतीन दिवसच चालले. त्यामुळे ते महराष्ट्रा पुरतेच नव्हे तर संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला. आता पुन्हा एकदा २३ नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरली आहे. यंदा या दिवशी विधानसभा निवडणुकीअंतर्गत मतमोजणी होणार आहे. याच दिवशी राज्यात सत्ता कोणाची येणार हेही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे समाज माध्यमांसह राजकीय नेत्यांकडून प्रचाराच्या रणधुमाळीत हा दिवस चर्चेत आला आहे.
२०१९ च्या निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्रित लढवल्या; मात्र मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण झाला. एकत्र नांदणाऱ्या शिवसेना आणि भाजप याच्यातून शिवसेनेने वेगळी चुळ मांडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडी वाढल्या. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केले. ते अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील फुटीनंतर कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली व अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले.
काय निकाल लागणार याचीच उत्सुकता
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘पहाटेचा शपथविधी’ झाल्यानंतर या दिवशी यंदा मतमोजणी होणार असल्याने या दिवशी काय निकाल लागणार, याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडीसह अन्य विविध पक्ष या निवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक अतिशय अटीतटीची आणि तेवढीच चुरशीची अशी निवडणूक होणार आहे. योगायोगाने आता त्याच दिवशी यंदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाच्या माध्यमातून अनेकांना 2019 सालच्या “पहाटेचा शपथविधी” आठवणार आहे.