सर्वसामान्य जनतेच्या मनातील गंभीर प्रश्न
जाकादेवी/ वार्ताहर;- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील शाळकरी मुलीचा ऐन दिवाळीच्या सुट्टीत विंचू दंश झाल्याने मृत्यू होणे हे आपल्या आरोग्य यंत्रणेचे, डॉक्टरांचे यश की अपयश ? असा प्रश्न रत्नागिरी तालुक्यातून गांभीर्याने पुढे आला आहे.
सृष्टी महेश पानवलकर हिला विंचू दंश झाल्याने तिला २९ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. त्यानंतर पालकांनी आपल्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून तिच्या पालकांनी रत्नागिरी येथील एका खाजगी दवाखान्यातही उपचारासाठी नेले. सृष्टी हिला चांगले उपचार व्हावेत, प्रकृतीत सुधारणा व्हावी,यासाठी एवढी धडपड करूनही प्राथमिक आरोग्य यंत्रणा, जिल्हा शासकीय रुग्णालय, आणि खाजगी आरोग्य यंत्रणेकडून सक्षम उपचार का मिळू शकला नाही ? हे आपल्या आरोग्य यंत्रणेचे, डॉक्टरांचे यश की अपयश? बारा वर्षीय मुलीला मानसिक आधार देण्यात किंवा समुपदेशन करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही का? असा प्रश्न तालुक्यातून अतिशय गांभीर्याने पुढे आला आहे.
सृष्टी पानवलकर ही अतिशय हुशार आणि जिज्ञासू विद्यार्थीनी होती. शिष्यवृत्तीसह तिने विविध स्पर्धांमध्ये उज्वल हे संपादने केले होते. जाकादेवी विद्यालयातील इ.सातवी अ सेमी इंग्रजी वर्गातील एक अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना अभ्यासात ती कधीच मागे नव्हती. बालपणापासूनच चांगला अभ्यास करत ती पुढे आली होती. प्रामाणिक प्रयत्न,कष्ट करुन भविष्यात एक चांगली उच्च अधिकारपदाची जागा मिळेल,असा तिला आत्मविश्वास होता. भविष्यात काहीतरी वेगळा आदर्श निर्माण करेल ,असा तिच्याविषयी तिच्या शिक्षकांमध्येही विश्वास होता. अतिशय मनमिळावू, सुस्वभावी आणि अभ्यासू असल्यामुळे तिच्या वर्तनाबद्दल समाजमनात आदर होता.
सृष्टी पानवलकर हिला विंचू दंशाने ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी आपला जीव कोवळ्या वयात, विद्यार्थी जीवनातच आरोग्य योजनेच्या गलथान कारभारामुळे गमवावा लागला हे आपल्या रत्नागिरी जिल्हा आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्याचे यश की अपयश? असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एवढी मोठी झेप घेतली असताना सर्पदंश , विंचू दंशावर औषधे उपलब्ध किती प्रमाणात आहेत? ती परिणामकारक आहेत का? संवेदनशील मनाची आरोग्य व्यवस्था या विभागात कार्यरत आहेत का ? असे प्रश्न सृष्टीच्या मृत्यूने समाजमनात खोलवर निर्माण झाले आहेत.