संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर दोन दुचाकींच्या धडकेत दोघेजण जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात तुरळ येथील गणेश मंदिराच्या नजीक घडला. सुरज फडकले (३५, तुरळ), संदेश भोजने (४०, धामापूर) हे दोघे ठार झाले आहेत
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एक्टिवा व युनिकॉर्न या दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने दुचाकीस्वार दोघेही फेकले गेले. यातील एक्टिवा दुचाकीचा नंबर एमएच ०८ बीए ७१६२ तर युनिकॉर्न गाडीचा नंबर एमएच ०८ एएम ६९६४ असा आहे. या दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एक दुचाकीस्वार जागीच मृत झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर पट्ट्यामध्ये काम सुरू आहे. अपघात झालेल्या ठिकाणी खरंतर दोन्ही मार्गिका काही काळ सुरू होत्या. काही वेळा काम सुरू असताना एक मार्गिका बंद ठेवून डायव्हर्शन करण्यात येते. यात कधी वाहन चालकांचा देखील गोंधळ उडतो. अशीच परिस्थिती या अपघातात झाली असावी अशी एकच चर्चा अपघाता दरम्यान ऐकायला मिळत होती.
त्यामुळे काम सुरु असताना ठेकेदार कंपनीने योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे बनले आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज लक्षात घेता कडवई येथील सूरज चव्हाण यांनी आपल्या खाजगी गाडीतून गँभीर जखमी असलेल्या सुरज फडकले याना तर चिखली येथिल बंड्या मयेकर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून संदेश भोजने याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले . मात्र दोघांचाही मृत्यू झाला . तेथील ग्रामस्थ अपघातास्थळी जमा झाले. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.