लांजा:- तालुक्याचे सुपुत्र डॉ. सौरभ लिमये यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) डीएम कार्डिओलॉजी या अंतिम परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले आहे.
त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या वैद्यकीय शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. सौरभ लांजा येथील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. य. दा. लिमये यांचे नातू आहेत. डॉ. सौरभ यांनी डीएम कार्डिओलॉजी रेसिडेन्सी मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केली.
डीएम कार्डिओलॉजी ही वैद्यकीय क्षेत्रातील एक उच्चतम वैद्यकीय पदवी असून या क्षेत्रातील परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळविणे ही एक अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते. प्रचंड मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर डॉ. सौरभ लिमये यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे यश लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. दरम्यान, डॉ. सौरभ लिमये यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.