२४ ते ३० मार्च पर्यंत आयोजन
कोकणच्या निसर्गाचे उत्तम रेखाटन
संगमेश्वर:- कलेचा प्रवास हा संवेदनशीलतेतून सृजनात्मकतेकडे होत असतो . जे समोर घडतं, दिसतं ,भावतं तेच अंतरात रुजतं आणि तेच चित्र, शिल्प, शब्द रूपाने प्रकट होते. एखादा विषय किती संवेदनशील खोल रुजतो तितक्या अर्थपूर्ण रेषा ,आकार, रंग,रंगप्रवाह आणि कुंचल्यांची सहजता कलाकृतीतून दिसते. ग्रामीण भागातील लोकजीवन लहानपणापासून पाहत, न्याहाळत आलेले संवेदनशील चित्रकार श्रीरंग मोरे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर कलादालनात दि. २४ मार्च ते ३० मार्च पर्यंत भरविण्यात आले आहे. या कला प्रदर्शनाचा कलारसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चित्रकार श्रीरंग मोरे यांनी केले आहे.
इचलकरंजी येथे कलाशिक्षक असणारे श्रीरंग मोरे हे संवेदनशील कलाकार म्हणून ओळखले जातात. शिरोळ तालुक्यातील जांभळी हे त्यांचे गाव. आजवर त्यांच्या कलाकृतींना अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. विविध ठिकाणच्या निसर्ग चित्रण स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन यश मिळवलं आहे. ठिकठिकाणी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शने देखील संपन्न झाली आहेत. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी साकारली आहेत. दिवाळी अंकांसाठी रेखाचित्रे, अर्क चित्रे साकारण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
ग्रामीण जीवनात कमालीचे रमणारे चित्रकार श्रीरंग मोरे हे अनेकदा संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रथीतयश निसर्ग चित्रकार चित्रकार विष्णु परीट यांच्याकडे येत असतात. परीट यांच्यासोबत चित्रकार श्रीरंग मोरे यांनी कोकणचा निसर्ग चित्रबद्ध केला. या निसर्गाची आणि कोकणच्या ग्रामीण जीवनाची त्यांना भुरळ पडली. कोकणसह आपल्या गावातील ग्रामीण जीवनाचं दर्शन त्यांनी आपल्या कलाकृतीतून साकार केला आहे. चित्रकार श्रीरंग मोरे यांच्या आयुष्याबरोबर कलाकृतीही आकार घेत आल्या. आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळवा आणि अर्थपूर्ण होऊ लागतो आणि जगणं भौतिक सुखांच्या आणि दिखाऊपणाच्या नकलीपणापेक्षा वेगळं आहे असे वाटू लागतं म्हणून कदाचित संतांनाही वाटून गेले ,लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा! कुठेच न पोहोचण्याच्या स्पर्धेत शर्यतीत मनुष्य अविरत धावत राहतो आणि कळून चुकतं, की आयुष्याच्या सुख क्षणांची शर्यत हरतो तेव्हा लहान मुलांच्या निरागसतेतला आनंद आणि सुख कळते. त्याचं कोड कौतुक वाटू लागतं.
लहान मुलांच्या व्यक्तीचित्रणातून तेच निरागस, हट्टी ,खोडकर ,सुख व्यक्त करण्याचा प्रयत्न चित्रकार श्रीरंग मोरे यांनी आपल्या कलाकृतीतून केला आहे.अबोल ,मौन असणाऱ्या व्यक्तीच्या मनातील विचारवेग आणि कष्टाने झिजलेल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास व्यक्तिचित्रातून मांडण्याचा प्रयत्न मोरे यांनी केला आहे. सौंदर्याची तारुण्याला पडलेली भुरळही चित्रित केली आहे .बैलगाडी ,घोडागाडी शर्यतींचा थरार आणि जोश रंग कामातून व्यक्त केला आहे. जल रंगाचं भळाभळ वाहणं आणि तैल रंगाचे हळुवारपणे गोंजारन तसेच ऍक्रेलिक रंगांचे रांगडे पण श्रीरंग मोरे यांनी रंगकामात अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे.
आयुष्याची शर्यत कोणाशीच नसल्याने कुठेच न पोहोचणारी असली तरी, मोरे यांच्या चित्रातील भावनिक शर्यत रसिकांच्या रसिक मनाला हळुवार स्पर्श करेल व शाश्वत जीवनाची अनुभूती देईल अशी चित्रकार श्रीरंग मोरे यांना आशा आहे. मुंबई येथील जहांगीर कलादालना २४ मार्चपासून सुरू झालेल्या त्यांच्या कलाप्रदर्शनास सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेश शिर्के, प्राचार्य माणिक यादव, निसर्ग चित्रकार विष्णू परीट, चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर, चित्रकार मनोज सुतार, नाना हजारे आदींनी श्रीरंग मोरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.