संगमेश्वर:-संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या विश्रांती कक्षातून एका महिलेच्या पिशवीतील १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि कपड्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पहाटे ४.०० ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अन्विता अविनाश पवार (वय २८, व्यवसाय गृहिणी) या ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील रहिवासी आहेत. त्या मूळच्या धामापूर ढोपरखोलवाडी (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील असून, आपल्या गावी येण्यासाठी दिवा ते रत्नागिरी जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेने प्रवास करत होत्या. पहाटे संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्या स्टेशनवरील
वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. यावेळी त्यांनी आपली पिशवी बाकड्याखाली ठेवली होती. मात्र, काही वेळातच अज्ञात चोरट्याने ही पिशवी चोरून नेली. चोरीला गेलेल्या पिशवीत सोन्याचे दागिने आणि कपडे होते. यामध्ये १५ ग्रॅम वजनाचं ७५,००० रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाचा ५०,००० रुपये किंमतीचा सोन्याचा हार आणि १ ग्रॅम वजनाचं ५,००० रुपये किमतीचं सोन्याचं पान यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची एकूण किंमत १ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
या घटनेनंतर अन्विता पवार यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.४३ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.