राजापूर:- एप्रिल-मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात ३३१ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात १०९ वनराई, ६ विजय बंधारे, २१६ कच्चे बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात हा पाणीसाठा उपयुक्त ठरणार आहे. या बंधारे उभारणीतून शासनाचे सुमारे ३०-३५ लाख रुपये निधीचीही बचत झाली आहे.
तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवत असते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरीही मार्ग काढता आलेला नाही तसेच शासनाने विविध नळपाणी योजनांच्या माध्यमातून शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीतर्फे दरवर्षी संभाव्य आराखडा तयार केला जातो; मात्र, हे नियोजनही फोल ठरते. या सार्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समितीने लोकसहभागातून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने दहा बंधारे बांधण्याचे नियोजनही करण्यात आले होते. तालुक्यात लोकसहभागातून ३३१ बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. त्याचा उपयोग भविष्यात तालुक्याला भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे आणि त्यामध्ये साठलेल्या पाणीसाठ्याचे महत्व कमालीचे वाढले आहे. एका बाजूला लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्यातील पाणीसाठा भविष्यातील पाणीटंचाईसाठी उपयुक्त ठरणार असताना हे बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले असल्याने सुमारे ३५ लाख रुपये शासनाच्या निधीची बचत झाली आहे. हा निधी गावच्या अन्य विकासकामांसाठी वापरता येणार असून, त्या द्वारे गावविकासालाही चालना मिळणार आहे.
राजापूर तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उभारले 331 बंधारे
