मुंबई:- अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला.
या सोहळ्यात चित्रपटाचे पोस्टर ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट आहे. असे महेश कोठारे म्हणाले.
पोस्टरवर लाल आणि काळ्या रंगांची तीव्र छटा संविधानाच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देते. मध्यभागी उठून दिसणारे ‘२६ नोव्हेंबर’ हे ठळक, दमदार अक्षरं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचा उठाव दर्शवणारा एक सळसळता समूह, हे स्पष्टपणे सांगतं की हा केवळ चित्रपट नसून, एक चळवळ आहे!
चित्रपटात अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. जुई जवादे डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी प्रमुखाची धुरा श्री. गिरीश वानखेडे यांनी प्रभावी सांभाळली आहे.
“हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल. संविधान दिन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा, हीच आमची इच्छा आहे.” अशी भावना दिग्दर्शक सचिन उराडे यांनी व्यक्त केली. तसेच हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे. असे अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार यांचे एकमत आले.