चिपळूण:- तालुक्यातील ६० हून अधिक मूर्तिशाळांमध्ये गणपतीबाप्पाची विविध रूपे साकारण्याचे काम मूर्तिकार करत आहेत. यावर्षी किमान ३० हजाराहून अधिक मूर्ती तालुक्यात साकारल्या जातील, असा विश्वास कारखानदारांना आहे.
”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, अशी विनंती व जयघोष मागील वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक गणेशभक्तांनी गणपती बाप्पाला पाहून केला होता. मात्र यावर्षी गणपतीचे आगमन गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १९ दिवस उशिराने होणार आहे. मूर्तिकार सदैव गणपतीबाप्पा विविध रूपात साकारण्याचा प्रयत्न करत असतो. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे बाप्पाच्या नवीन स्वरूपातील मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना मोठा वाव मिळाला आहे. या संधीचा फायदा घेत मूर्तिकारांनी कंबर कसली आहे.