देवरूख:- खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्यी दुर्दैवी घटना देवरूख नजीकच्या साडवली एकता नगर येथे घडली. राजेंद्र दत्ताराम मणचेकर ( 29) वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र मणोकर हा मामासह शनिवारी रात्री 9.30 वाजता घरानजीक असलेल्या सप्तलिंगी नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. खेकडे पकडत असताना राजेंद्र याचा पाय घसरून तो थेट नदीपात्रात कोसळला. धो धो पाऊस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. पाण्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र हा पाण्यात बुडाला. हा प्रकार राजेंद्र याच्या मामाने ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिला. ग्रामस्थांनी तत्काळ राजेंद्र या शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र अंधार व पाणी गढूळ असल्याने शोध मोहिमेला अपयश आले.
रविवारी सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी शोध घेतला. 11 वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्याजवळ राजेंद्र याचा मृतदेह मिळून आला. याची खबर देवरूख पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.