लांजा:- लांजा तालुक्यातील भांबेड पेठदेव येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर लांजा पोलिसांनी कारवाई करत दारू आणि मुद्देमाल जप्त केला.
भांबेड येथे एकजण विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी 8 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्याने भांबेड पेठदेव येथे सचिन नंदकुमार बेर्डे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या काजूच्या बागेमध्ये धाड टाकली. यावेळी चंद्रकांत रामचंद्र लाड ( 51 वर्षे रा.हर्दखळे वाडावाडी) हा गावठी हातभट्टीच्या दारूसह आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लिटर मापाच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाच लिटरची गावठी हातभट्टीची दारू तसेच लाल रंगाच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये चार लिटरचे गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 570 रुपयांचा गावठी हातभट्टीचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गैरकायदा आणि विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या प्रकरणी चंद्रकांत लाड यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉ.दिनेश आखाडे हे करत आहेत.