दरवर्षी फक्त जागतिक महिला दिनी किंवा स्त्रियांच्या विविध कार्यक्रमातून महिलांच्या अनेक समस्या, प्रश्न, हक्क – अधिकार यावर विविध कोनातून मंथन पार पडत असते. या मंथनातून निघालेली समान वागणूक, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि तिच्या नावाने मालमत्ता करणे हे ‘हलाहल’ कुणीच स्वतः प्यायला तयार नसते. ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच परंतु याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे स्त्रियांनी पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडणे. म्हणजे पुरुषांनी जी बंधने पिढ्यानंपिढया लावून दिलीत त्या बंधनाची जपणूक स्त्रिया जीव लावून करताना दिसतात. जे कुणी या बंधनाविरुद्ध लढतात त्यांच्याविरुद्धसुद्धा स्त्रिया दंड थोपटून तयारच असतात, कारण ते बंधन आहे याची त्यांना जाणीवच नाही.
मणिपूर गेल्या अडीच महिन्यापासून सातत्याने जळत आहे. तिथे शेकडो मृत्यूमुखी पडले आहेत. त्याच मणिपूर मधे एका जमावाकडून दोन स्त्रियांना निर्वस्त्र करून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. या घटनेची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर सगळे जागे झाले. मग कळलं कि ही चित्रफित ४ मे २०२३ ची म्हणजे अडीच महिन्यापूर्वीची आहे. ही घटना घडून गेल्यावर त्यावर कुणीही कारवाई केली नाही पण जशी चित्रफित व्हायरल झाली तशी तसे सर्वजण खडबडून जागे झाले. ही घटना प्रचंड अस्वस्थ करणारी आहेच परंतु त्याहून अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे अशा घटनेची पाठराखण करणाऱ्या प्रवृत्ती या देशात असणे आणि त्यातसुद्धा महिला असणे.
खा. नवनीत राणा म्हणतात “विरोधकांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, मणिपूर चे मुख्यमंत्री राजीनामा द्यायला चालले होते पण काही महिलांनी त्यांना रोखले त्यामुळे ते मुख्यमंत्री चांगलेच आहेत”, मग वाईट कोण आहे? अडीच महिन्यापासून होणारा हिंसाचार रोखू न शकणारे, महिलांची नग्न धिंड निघाल्यावर त्यावर मुख्यमंत्री आता म्हणतात, ” अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, ती व्हायरल होऊ नयेत म्हणूनच आम्ही इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे.” हे एकच प्रकरण इतके अस्वस्थ करणारे असताना अशी अनेक प्रकरणे घडली आहेत म्हणणारे आणि ही माहिती असूनही काहीही न करणारे मुख्यमंत्री चांगले कसे असू शकतात? राष्ट्रीय महिला आयोग ट्विटर ला सांगतो की ती महिलांची चित्रफित ट्विटर वरून हटवा कारण हा व्हिडीओ पीडितांच्या ओळखीशी तडजोड करतो आणि हा दंडनीय गुन्हा आहे.
पण आयोग अशा घटना आणि हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य आणि केंद्र सरकारविरोधात ब्र शब्द काढत नाही. देशात सत्ताधारी आणि विरोधक मिळून एकूण ७८ महिला खासदार आहेत. त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्या महिला खासदार या घटनेबद्दल व्यक्त झाल्यात. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या महिला असून आणि त्यातही आदिवासी समाजातून येत असूनही त्यांना याबद्दल काहीच व्यक्त व्हावंसं वाटू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? आता महिलांनीच आयुष्याच्या मशाली पेटवून रणरागिणी होऊन अत्याचारला प्रतिकार करायला हवा…!
लेखिका/पत्रकार: पूनम पाटगावे (जोगेश्वरी- मुबंई) मोबाईल नंबर – 81497 34385