लांजा : कोकणात प्रारंभीच्या काळात राहणाऱ्या मानवाने साधारण २ऱ्या ते ५ व्या शतकातील जांभा दगडात कोरलेली लेणी लांजा तालुक्यातील जावडे येथील कातळगाव जवळ आहेत.
निसर्गरम्य परिसर, समोरून वाहणारा ओढा व ओढ्याच्या तिरावर जांभ्याच्या भिंतींमध्ये कोरलेली ही लेणी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
छोटे गाभारे त्यातील मुर्त्या, वरील बाजूला असलेली कातळशिल्प, ओढा, अस बरंच काही या परिसरात पाहण्यासाठी आहे तसेच एक वन डे पिकनिक साठी देखील उत्तम पर्याय आहे. पण बरेचसे पर्यटक अनभिज्ञ असल्याचे दिसते शिवाय संवर्धनाअभावी येथील शिल्पांची मोठ्याप्रमाणात झिज झालेली दिसून येते.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत कॉलेज ने या निसर्गरम्य लेणी समूहाला भेट दिली. यावेळी कॉलेज च्या वतीने लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गावर मार्गदर्शक फलक लावण्यात आला. तसेच काही लेण्यांसमोरील वाढलेली झाडे फांद्या तोडून साफ केल्या. जेणेकरून खाली ओढ्यात न उतरता ही लेणी स्पष्ट दिसावी व पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा.
कल्पना कॉलेज च्या वतीने प्रा. विकी पवार यांनी बोलताना गावाला लाभलेल्या इतिहासाचं जतन करणे आपली नैतिक जबाबदारी असून, या लेणी समूहाच्या विकासातून गावच्या विकासाला देखील चालना मिळेल त्यासाठी ग्रामपंचायत व गावचे ग्रामस्थ यांनी पुढाकार घेत प्रयत्न करायला हवेत, त्यासाठी लागणारी मानसिकता व इच्छाशक्ती ही तितकीच महत्वाची आहे. तसेच यासाठी संस्थेकडून काही मदत लागल्यास नक्की सहकार्य करण्याचे देखील सांगितले.
उपसरपंच श्री. गवाणकर यांनी देखील याबाबत गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन लेण्यांच्या संवर्धनासाठी चर्चा करून पुढील प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी जावडे गावाच्या सरपंच सौ जान्हवी सोडये मॅडम, उपसरपंच श्री. चंद्रकांत गवाणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. सूर्यकांत नामये, गावाचे गावकर श्री. सीताराम सोडये, कल्पना असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. मंगेश चव्हाण सर, कल्पना कॉलेज चे लिपिक प्रशांत जाधव तसेच ग्रामस्थ श्री. विजय पवार (बौद्धवाडी), श्री. सुभाष शिंदे (ताटकेवडी) , श्री. शंकर सोडये, श्री. हरी सोडये (कातळगाव) व कॉलेज चे विद्यार्थी उपस्थित होते.
कल्पना कॉलेज लांजाची जावडे कातळगाव लेणी समूहाला भेट
