गुहागर/उदय दणदणे:- तालुक्यातील निवोशी भेलेवाडी क्षेत्रातील जीर्णवस्थेत असलेले एकूण ६ विद्युत पोल त्यातील २ पोल पडण्याच्या स्थितीत असल्याने ते बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभागीय कार्यालय गुहागर व पालशेत यांच्या संबंधित अधिकारी यांच्याकडे निवोशी (भेलेवाडी) ग्रामस्थांनी विनंती पत्रव्यवहार करून दोन महिने झाले तरी सदर ठिकाणी साधी पाहणीही करण्यात आली नसल्याने सदर ठिकाणी जीवित हानी होण्याचा धोका संभवत असून सदर समस्ये प्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महावितरण कंपनीने सदरचे काम त्वरित हाती घेऊन जीर्ण पोल बदलावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी उपकार्यकारी अधिकारी,महावितरण उपविभाग, गुहागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,निवोशी भेलेवाडी गावातील धुमकवाडी वस्तीत विद्युत खांब तसेच दणदणेवाडी येथील घाणेकर यांच्या घराजवळील २ विद्युत खांब असे अनेक ठिकाणी एकूण ६ विद्युत खांब जीर्णवस्थेत असल्याचे दिसुन येत आहेत.निवोशी गावातील काही विद्युत खांब जमिनीलगत गंजलेले अवस्थेत आहेत ते खांब धोकादायक स्थितीत असून केव्हाही कोसळून मोठया प्रमाणात जीवित हानी व वित्त हानी होऊ शकते. या धोकादायक विद्युत खांब संदर्भात जीवितहानी झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील असेही या निवेदनात म्हटले आहे.
विद्युत खांब कोसळून एखादी दुर्घटना किंवा जीवित हानी झाल्यास फक्त आपणांस जबाबदार धरले येईल याची नोंद घ्यावी व त्वरीत हे गंजलेले विद्युत खांब बदलुन दयावेत व येथील ग्रामस्थांना सहकार्य करावे अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही मनसेचे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ,सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, कौंढर काळसूर ग्रामपंचायत सदस्य सचिन जोयशी, कौंढर काळसुर मनसे शाखाध्यक्ष सुनील मुकनाक तसेच मनसे सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.